<font face="mangal" size="3px">त्वरित सुधारक कारवाई खालील बँकांबाबत आरबीआ - आरबीआय - Reserve Bank of India
त्वरित सुधारक कारवाई खालील बँकांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण
डिसेंबर 22, 2017 त्वरित सुधारक कारवाई खालील बँकांबाबत आरबीआयचे स्पष्टीकरण त्वरित सुधारक कारवाई (पीसीए) खाली ठेवण्यात आल्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका बंद करण्यात आल्या असल्याबाबत, सोशल मिडीयासह इतर माध्यमातूनही काही चुकीचे संदेश दिले जात असल्याचे भारतीय रिझर्व बँकेच्या नजरेस आले आहे. ह्याबाबत आपले लक्ष, दि. जून 5, 2017 रोजी दिलेल्या पुढील प्रमाणे असलेल्या वृत्तपत्र निवेदनाकडे वेधण्यात येत आहे. ‘भारतीय रिझर्व बँकेने स्पष्ट केले आहे की, पीसीएचा साचा, सर्वसाधारण जनतेसाठी असलेले नेहमीचे व्यवहार निर्बंधित करण्यासाठी ठेवण्यात आलेला नाही. ह्याशिवाय असेही स्पष्ट करण्यात येत आहे की, बँकांचे वित्तीय स्वास्थ्य सशक्त ठेवण्यासाठी, रिझर्व बँक, तिच्या पर्यवेक्षणीय साचाखाली निरनिराळ्या उपायांचा/साधनांचा वापर करत असते. पीसीए हे असेच एक पर्यवेक्षणीय साधन असून त्याद्वारे, सुरुवातीलाच देण्यात आलेला एक सावधानतेचा इशारा म्हणून, बँकांच्या काही कामगिरी निर्देशकांवर देखरेख ठेवली जाते, आणि भांडवल, अॅसेट्सचा दर्जा ह्याबाबतच्या मर्यादांचा भंग/उल्लंघन केले गेल्यास पीसीए सुरु केले जाते. ह्याचा उद्देश म्हणजे, बँकांचे वित्तीय स्वास्थ्य पूर्ववत करण्यासाठी, रिझर्व बँकेने विहित केलेल्या उपायांसह, वेळेवारी सुधारात्मक उपाय योजण्यास बँकांना साह्य करणे. ह्या पीसीए साचामुळे, वरील क्षेत्रातील व्यवस्थापनांशी अधिक जवळून संबंध ठेवून अशा बँकांवर लक्ष केंद्रीत करण्याची संधी रिझर्व बँकेला उपलब्ध होते. अशा प्रकारे काही जोखीमयुक्त कार्यकृती बाजूला ठेवून, त्यांचे भांडवल टिकवून ठेवण्यावर लक्ष केंद्रीत करुन परिणामी त्यांचे ताळेबंद अधिक सशक्त करण्यास, पीसीए प्रणाली बँकांना प्रोत्साहन देते. रिझर्व बँकेकडून सांगण्यात येत आहे की, ही पीसीए प्रणाली, डिसेंबर 2002 पासूनच कार्यान्वित झाली असून, एप्रिल 13, 2017 रोजी देण्यात आलेली मार्गदर्शक तत्वे ही, ह्या पूर्वीच्या प्रणालीची केवळ एक पुनरावृतीच आहे.’ आरबीआय येथे वरील स्थिती पुनश्च कळवीत आहे. जोस जे कत्तूर वृत्तपत्र निवेदन : 2017-2018/1719 |