<font face="mangal" size="3">पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. ह्यां - आरबीआय - Reserve Bank of India
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांच्या ठेवीदारांसाठी, रिझर्व्ह बँकेकडून निकासी मर्यादेत रु.40,000/- पर्यंत वाढ
ऑक्टोबर 14, 2019 पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. ह्यांच्या ठेवीदारांसाठी, रिझर्व्ह बँकेकडून निकासी मर्यादेत रु.40,000/- पर्यंत वाढ येथे स्मरण व्हावे की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, ऑक्टोबर 3, 2019 रोजी, पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक लि. च्या ठेवीदारांना, त्यांच्या खात्यांमधील एकूण शिल्लकेमधून रु.25,000/- (रुपये पंचवीस हजार) पर्यंतची रक्कम काढण्यास परवानगी दिली होती. वरील बँकेची तरलता-स्थिती व तिच्या ठेवीदारांना प्रदान करण्याची क्षमता ह्यांचा आढावा घेऊन, भारतीय रिझर्व्ह बँकेने ही निकासी मर्यादा, आधीच्या रु.25,000/- सह आता रु.40,000/- (रुपये चाळीस हजार) पर्यंत वाढविण्याचे ठरविले आहे. वरील शिथिलतेमुळे, वरील बँकेचे सुमारे 77% ठेवीदार त्यांच्या खात्यातील संपूर्ण शिल्लक रक्कम काढू शकतील. काही व्यक्तींनी केलेल्या फसवणुकीमुळे वरील बँकेची आर्थिक स्थिती लक्षणीय रितीने वाईट झाली आहे. ही बाब भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नजरेस येताक्षणीच, एक प्रशासक नेमण्याची कारवाई करण्यात आली. आणि वरील बँकेचा उपलब्ध स्त्रोत सुरक्षित ठेवून व त्यांचा गैरवापर होणार नाही किंवा ते अन्यत्र वळविले जाणार नाहीत ह्याची खात्री करण्यात आली. दरम्यान, वरील बँकेचे अधिकारी व बँकेमधील फसवणुकी/वित्तीय अनियमितता ह्यांच्याशी संबंधित कर्जदार आणि लेखा-पुस्तकातील हेराफेरी संबंधाने वरील बँकेने दाखल केलेल्या तक्रारींवर आधारित, आर्थिक गुन्हे विभाग, महाराष्ट्र पोलिस ह्यांनी ह्या बाबतीत चौकशी सुरु केली आहे. ह्याशिवाय संबंधित व्यवहारांमध्ये शोध घेण्यासाठी, प्रशासकाने, फोरेन्सिक ऑडिटर्सचीही नेमणूक केली आहे. बँकिंग विनियामक अधिनियम 1949 च्या कलम 56 सह वाचित कलम 36 अअअ (5)(अ) अनुसार आरबीआयने, प्रशासक व तीन सभासदांची एक समिती नेमली असून, वरील बँकेच्या निरनिराळ्या समस्या जलदतेने सोडविण्याचे कार्य करत आहे. रिझर्व्ह बँक ह्यावर जवळून देखरेख करत असून, वरील बँकेच्या ठेवीदारांच्या हितसंबंधांसाठी आवश्यक ती पाऊले उचलत राहील. (योगेश दयाल) प्रेस प्रकाशन : 2019-2020/942 |